३२९ सनकसनंदन भक्त अंतरंग
सनकसनंदन भक्त अंतरंग । हरिरुपे सांग सर्व झाले ।। १ ।।
तेथील उद्बोध उद्गारु पारुषे । सर्व हाचि दिसे हरी आम्हां ।। २ ।।बुद्धीबोध नाही क्षमारूप सर्व । तेथे देहभाव अर्पियेला ।। ३ ।।
निवृत्ति संग सुलभ श्रीरंग । टाकिला उद्वेग कल्पनेचा ॥ ४ ॥
सरलार्थ:
सनकादिक अंतरंग भक्त हे हरिरूपाने सर्वांगपरिपूर्ण झाले ||१|| त्या ठिकाणचा ज्ञानाचा वर आलेला बोध उद्गाराच्या रूपाने प्रगट झाला व हाच हरि आम्हाला सर्वरूपाने दिसत आहे ||२|| तेथे बुद्धि व बोध दोन्हीहि नसून सर्व एकरूपच आहे. तेथेच आम्ही देहभावना अर्पण केली
।।३।। (गळ्यात तुळशीची माळ हे तेच समर्पण आहे.) आता निवृत्ति मोकळा झाला असून त्याने सोपा असा श्रीरंग श्रीहरि धरला आणि कल्पनेची उदासिनता, कल्पनेचे नैराश्य टाकून दिले आहे ॥४॥