३३४ तंत आणि वितंत त्यामाजी मथित
तंत आणि वितंत त्यामाजी मथित । नाद उमटत स्वानंदाचा ॥ १ ॥
सोहं बीजतत्त्व गुरुनाम मंत्र । ज्ञानी उपासित हरिराज ।। २ ।।
भेदूनि कुंडलणी गोल्हाट निकट । आत्माराम पेठ पांडुरंग ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे मी सर्वस्व होईन । हरि हा हो मरीन पूर्ण देहीं ॥ ४ ॥
सरलार्थ:
तंतु वाद्याच्या सुस्वरामध्ये मथिलेला-मिसळलेला नाद-आवाज स्वानंदाने उमटत असतो ॥१॥ तेच सोहं ते तत्त्व श्रीहरि आहे असा गुरुमंत्र जाणून ज्ञानीलोक हरि या नामाने उपासना करीत असतात ॥२॥ कुंडलिनीचा भेद करून प्राणस्थिरत्वाच्या जागेजवळच या आत्माराम पांडुरंगाची पेठ मिळण्याची जागा आहे ||३|| श्रीनिवृत्तिनाथ म्हणतात- मी सर्वस्वे त्याला समर्पित होऊन हा देह हरिनेच भरून टाकीन ||४||