३४३ ज्याचेनि सुखे चळत पै विश्व
ज्याचेनि सुखे चळत पै विश्व । नांदे जगदीश सर्वांघटी ॥ १ ॥
त्यांचे नाम हरि त्यांचे नाम हरि । प्रपंच बोहरी कल्पनेची ।। २ ।।
शांति त्याची नारी प्रकृति विकारी । उन्मनि बोवरी हृदयांतु ॥ ३ ॥
निवृत्तिदेवीं साधली राणीव । हरपले भाव इंद्रियांचे ॥ ४ ॥
सरलार्थ:
ज्याच्या सत्तासुखाने ह्या विश्वाचा व्यापार चालु आहे. तोच जगाचा ईश्वर सर्वभूतांत नादंत आहे. सत्ता व सत्ताधीश एकच आहे, अधिष्ठान, अध्यस्त व त्याचा द्रष्टा हे सर्व एकच एक आहेत ।।१।। त्याचेच नाव हरि आहे. त्याच्या ज्ञानाने कल्पनाप्रपंच नाहिसा होतो ।। २ ।। शांतीहि त्या पुरूषोत्तम श्रीहरिची पतिव्रता पत्नी असून विकाररूप प्रकृतिच्या हृदयात उन्मनी अवस्थाहि त्याचीच निवास खोली आहे ||३|| निवृत्ति देवाने ते निर्गुण स्वरूप धरले असून श्रीहरि प्रेमाने संपूर्ण शांतीचे ते स्वामी झाले आहेत ॥४॥