३४५ अव्यक्ताचे घरी व्यक्तचि पै नांदे
अव्यक्ताचे घरी व्यक्तचि पै नांदे । मायेचेनि छंदे जग दावी ॥१॥
गगनीं अभ्रपडळ वायो संगे येत । तैसे ते निभ्रांत मेघवृष्टी ॥२॥
अद्वैत संचले द्वैताचा आचार । मायेचा घराचार वोडंबरी ॥३॥
निवृत्ति देवीं धरिली माया हे असार । प्रपंच परिवार निर्दाळिला ॥४॥
सरलार्थ:
अव्यक्त स्वरूपात व्यक्त राहते. नामरूपातीत परब्रह्माचे ठिकाणी नाम रूपात्मक विश्व दिसत आहे. तो परमात्मा आवडीने हे जग दाखवीत आहे ॥१॥ आकाशात मेघांची फळी वाऱ्याने येते व त्यानेच मेघांचा वर्षावहि होतो. ।। २ ।। अद्वैत कोंडून भरले पण व्यवहार मात्र द्वैताचाच आहे. हा सर्व मायेचा गृहस्थाश्रम असून एक नाटक आहे. ।।३।। निवृत्तिदेवाने ही असार-खोटी माया जाणली व प्रपंचाचा पसारा नष्ट केला ॥४॥