३५३ एकतत्त्व हरि अवघी सृष्टि त्याची
एकतत्त्व हरि अवघी सृष्टि त्याची । वासना मोहाची जाली असे ॥१॥
तत्व ते श्रीहरी अद्वैतकुसरी । ब्रह्मांडवोवरी क्षरलासे ॥ २ ॥
त्रिपुटीं त्रिगुण सत्वरजसार । नामेंचि वेव्हार तुटे रया ।। ३ ।।
निवृत्ति समता हरि प्रेमगुण । कृष्ण हेंचि ध्यान मनामाजीं ॥ ४ ॥
सरलार्थ:
वास्तविक एक तत्त्व हरिच असून ही सर्व सृष्टि त्याचीच आहे. पण मोहाने वासना निर्माण होऊन प्रपंच भावना झाली आहे ।।१।। व ते तत्त्व श्रीहरिच असून अद्वैतज्ञानाच्या युक्तिने जाणावयाचे आहे. त्यातून ब्रह्मांडाची ओसरी निर्माण झाली आहे. (बाहेरची बैठक) ।।२।। अरे राजा, सत्व रज तम या त्रिपुटीरूप गुणत्रयाचे सार अशा श्रीहरिच्या नामानेच हा खोटा व्यवहार नाहिसा होतो ।। ३ ।। हरिच्या प्रेमाने ही समता प्राप्त होते व श्रीकृष्ण हेच ध्यान मनामध्ये राहते. ॥ ४ ॥