३५४ पितांबर दिपडे दीप कळिमा श्याम
पितांबर दिपडे दीप कळिमा श्याम । शिव आत्माराम प्रेमतनु ॥। १॥
ब्रह्मांड धवळले दिसे दशदिशा । ब्रह्मचि सहसा ब्रह्मपणें ॥ २ ॥
न दिसे भानमान दृश्याचा अनुमान । आपणचि पूर्ण तदाकार ।। ३ ।।
निवृत्ति निर्विकार मनोमय सार । सर्व हा आकार ब्रह्मरूप ॥ ४ ॥
सरलार्थ:
प्रभुच्या पितांबर दिव्याची हि सावळी प्रभा असून प्रेमरूप देहात हा शिवस्वरूप आत्माराम आहे ।।१।। त्या आत्मतेजाने दाहीदिशांत ब्रह्मांड लख्ख प्रकाशमान झाले व ब्रह्मरूपाने एकदम ब्रह्मच झाले आहे ।।२।। आता ज्ञान व दृश्याचे अनुमान दिसत नाही तर आत्माच आपण स्वत: तदाकार झाला आहे. ।। ३।। निवृत्ति हा खरोखर निर्विकार मनाने सर्व आकार ब्रह्मरूपच पाहत आहे ॥४॥