३५५ शून्य ते पुसिले निरशून्य बिंबले
शून्य ते पुसिले निरशून्य बिंबले । ब्रह्म उगवलें तेजाकार ।। १ ।।
कळिसि कळिते वासना आकळीते । दिनकाळ हरितें सेवितसे ॥ २ ॥
माजिटा श्रीहरि दिसे परोपरी । घटमठसरी एक शोभे ॥ ३ ॥
निवृत्ति दाटुगें गुरूमुखे कळले सर्वत्र गोपाळें केलें मज ॥ ४ ॥
सरलार्थ:
आता शून्य हाताने पुसल्याने शून्यरहित स्थितीचा उगम होतो व प्रकाशस्वरूप ब्रह्मच प्रगट होते ।। १ ।। ज्ञानकळी तेज बाजुला सारून व वासनेला आवरून सतत आम्ही हरिचीच सेवा करतो ॥२॥ या सर्व सृष्टिमध्ये असलेला श्रीहरि परोपरीने दिसतो व घटमठात त्याची सारखी शोभा दिसते ||३|| श्रीनिवृत्तिनाथ म्हणतात – हे सर्व वस्तूमध्ये दाटून भरलेले परब्रह्म मला गुरुमुखाने कळले आहे. श्रीहरि गोपाळाने मला सर्व व्यापक केले आहे ॥ ४ ॥