१४. पुष्कर्णीच्या काठी वैष्णवांचे भार
पुष्कर्णीच्या काठी वैष्णवांचे भार । देव ऋषीश्वर जेवताती ॥ १ ॥
अवघियां पात्रे वाढिलीं नारायणें । सोडिती पारणें निवृत्तिराज ॥ २ ॥
विठोबा रखुमाईनें घेतला निवृत्ति । जेविताती पंक्ति गोपाळांच्या ॥ ३ ॥
जेवले वैष्णव आणि हृषिकेशी । गेले आचमनासी पुष्कर्णीतें ॥ ४ ॥
अवघे संत तेथें बैसले निवाडे । पुंडलिक विडे वाटीतसे ॥ ५ ॥
नामा म्हणे केशव बैसले कीर्तनास । होतो कासावीस निवृत्तिराज ॥ ६ ॥