१८ समाधीच्या पाळीं बैसली सकळीं
समाधीच्या पाळीं बैसली सकळीं । केला त्या गोपाळी जयजयकार ।। १ ।।
निवृत्तिच्या संगे पुंडलिक पांडुरंग । सिद्ध झाले सांग समाधीसी ॥ २ ॥
निवृत्तिदेवे वंदिलीं सकळांची पाऊलें । तीर्थ तें घेतलें विठोबाचें ॥ ३ ॥
पताकांची छाया समाधीसी आली । उतरले खालीं निवृत्तिदेव ॥ ४ ॥
पुंडलिक पांडुरंग गेले बरोबरी । बैसले आसनावरी निवृत्तिराज ॥ ५ ॥
नामा म्हणे देवा काय पाहावें आतां । गेला पंढरिनाथा चिद्भानु तो ॥ ६ ॥