००१ अवीट अमोला घेता पैं निमोला
अवीट अमोला घेता पैं निमोला ।
तो प्रत्यक्ष देखिला भीमातटीं ॥ १ ॥
अव्यक्त साकार अकारिला अंकूर ।
क्षरला चराचर भक्तिकाजें ॥ २ ॥
अनुमान विटे सर्वाघटींमाजिटें ।
तें परब्रह्म ईटें भक्तिसाह्य ॥ ३ ॥
निवृत्ति घनवट पिकलिसे पेठ ।
पुंडलिकें प्रगट केलें असे ॥ ४ ॥
सरलार्थ:
पांडुरंग परमात्मारुपी वस्तू ही नित्य आकर्षक आहे, महामौल्यवान आहे, ज्याची किंमतच करता येणार नाही असा आहे. असे जरी असले तरी, मी जेंव्हा तो मिळवावयास गेलो तेंव्हा तो मला विनामूल्यच प्राप्त झाला. कारण पंढरपूरला चंद्रभागा नदीच्या तीरावर तो मी साक्षात माझ्या डोळ्यानेच पाहिला. ।।१।। खरे तर त्यांचे स्वरूप हे अमूर्त आहे परंतु भक्तांच्या भक्तिमुळे अमूर्तातूनच अंकुरित होऊन तो सगुण साकार असे जगत झाला आहे. ।।२।। तो परमात्मा सर्वभूतमात्रात जरी असला तरी त्याला पाहण्यास अनुमान-प्रमाण, सर्व तर्क-वितर्क कमी पडले आहेत. तो केवळ भक्तिद्वारेच प्राप्त होणारा आहे. ।।३।। श्री निवृत्तिनाथ म्हणतात, पांडुरंग परमात्मारुपी वस्तूने भरभरून फळास आलेली पंढरपूर ही बाजारपेठ आपल्याला भक्त पुंडलिकामुळेच विनासायास मिळाली आहे. ।।४।।
भावार्थ:
जो विटत नाही, संपत नाही, जो कधी पुर्णत्वाला जात नाही, असा तो पांडुरंग पुर्वीच प्राप्त असल्यामुळे त्याला मी भीमा तटी सगुण रुपात पाहिला तो निर्गुण अव्यक्त रुप सोडुन सगुण होऊन आकारले आहे. असा हा परमात्मा भक्तांच्या भक्तीभावाने जगतात पाझरला आहे. जरी तो विटेवर उभा असला तरी सर्वांच्या ठिकाणी तो आहे. व तो भक्ताच्या हृदयात राहुन साह्य करतो. निवृत्तिनाथ म्हणतात असे हे परब्रह्म पुंडलिकाने पंढरपूर पेठेत उभे केलें आहे.
English:
The Pandurang divine object is ever attractive, precious, priceless. However, when I went to get it, I got it for free. Because I actually saw him with my own eyes on the banks of the river Chandrabhaga at Pandharpur. 1. In fact, His form is intangible, but due to the devotion of the devotees, He has sprouted from the intangible and has become a tangible reality. 2. Even though that Supreme Being is omnipresent, to see Him, speculations and arguments are lacking. It is attainable only through devotion. 3. Shri Nivrittinath says, Pandharpur market, which has come to fruition full of Pandurang divine goods, is due to Bhakta Pundlika. 4.