०४३ वर्ण व्यक्ति सखे वर्णाश्रम मुखें

वर्ण व्यक्ति सखे वर्णाश्रम मुखें ।
ब्रह्मनाम सौख्य योगीजन ॥१॥
तें हें कृष्ण नाम देवकीसबळ ।
वसुदेवकुळ गोपवेषे ॥२॥
धर्म धरि धार धारणा धीरट ।
निरालंब पीठ सौख्य शोभा ॥३॥
निवृत्ति सौभाग्य ब्रह्म सर्व सांग ।
गुरुनामें पांग हरे एक ॥४॥
सरलार्थ:
जेथे योगीजनांचे हि वर्ण व व्यक्तित्व नाहिसे होते व वर्णाश्रमासहि मुकतात. केवळ ब्रह्मनामानेच ते सुखी असतात ।।१।। तेच हे ब्रह्म कृष्ण या नावाने देवकीस बळ देते व गोपवेष धारण करून वसुदेवाचे कुळ धन्य करते. ।।२।। ज्यामुळे धर्म धीटपणे स्थिर व सूक्ष्म धारणा धरतो व निराश्रयाची शोभा अधिक वाढते ।।३।। निवृत्तिच्या परम भाग्याने एका गुरुनामाने समग्र ब्रह्म लाभ होऊन सर्व शीण नाहिसा झाला आहे ।।४।।
भावार्थ:
योगीजन सुध्दा जीवन पोषणासाठी आपल्या वाटेला आलेला व्यवसाय करुन तसेच आपल्या वर्णातील लोकांच्या साहाय्याने विवाह करुन जीवन व्यतीत करत असतात. अशा योगीजनांचे परब्रह्म देवकीच्या पोटी जन्माला येऊन वसुदेवाच्या घरी गोपवेशात वावरत असुन त्यामुळे त्यांचे भाग्य उजळले आहे. ते परब्रम्ह निरलंब स्थानात सौख्याने राहात असताना धर्माला धारण करुन धर्मरक्षण करते. निवृत्तिनाथ म्हणतात मला त्याचे ब्रह्मस्वरुप. मी माझ्या गुरुंच्या केलेल्या नाम चिंतनामुळे कळले.