०४७ गगनवाड दृष्टी सर्व तत्त्व शेखीं

गगनवाड दृष्टी सर्व तत्त्व शेखीं ।
जीव शिव पोखी कारण सिद्ध ॥१॥
तेची हें सांवळें स्वरूप गोजिरें ।
कृष्णनाम खरें नंदाघरीं ॥२॥
पृथ्वीचें तळवट अनंत विराट ।
आपण वैकुंठ गोपीसंगे ॥३॥
निवृत्ति तप्तर लक्षते स्वानंद ।
नित्यता आनंद ब्रह्मानंदे ॥४॥
सरलार्थ:
आकाशाहूनहि मोठे-व्यापक सर्व तत्त्वासह दृष्टिने सर्व जीव व शिवासहि कारण रूपाने सिद्धच असल्याने तेच पुष्ट करीत आहे ।।१।। तेच हे सावळे स्वरूप अति सुंदर रूपाने कृष्ण होऊन नंदा घरी नांदत आहे हे सत्य आहे ।।२।। सर्व पृथ्वी पायातळी घातलेले देशकाल वस्तु मर्यादा रहित विशाल वैकुंठ परब्रह्मच आपणहून गोपी समवेत राहत आहे ।।३।। निवृत्ति सावधपणे स्वानंद लक्ष्य ठेवून त्या ब्रह्मानंदाचे नित्य आनंद सेवन करीत आहे ।।४।।
भावार्थ:
गगनाहुन जास्त लांब जाणारी दृष्टी असलेले परब्रह्मा मुळे जीव व शिवाची वाढ होते. ते सिध्द तत्व आकाशाहुन मोठे व सर्वांच्या परे आहे. तेच तत्व सगुण सावळे कृष्णरुप घेऊन नंदाच्या घरी अवतरले आहे. मोठेपणाचे माप असलेली पृथ्वी हि त्याच्या पायाशी असुन ते पृथ्वीपेक्षा विराट आहे. ते तत्व श्रीकृष्ण बनुन गोपीसवे क्रीडा करते. निवृत्तिनाथ म्हणतात मी स्वानंदासाठी तत्पर असुन त्यावर लक्ष ठेऊन हा आनंद नित्य उपभोगत असतो.