०५१ खुंटले वेदांत हरपले सिद्धांत

खुंटले वेदांत हरपले सिद्धांत ।
बोलणें धादांत तेंही नाहीं ॥१॥
तें रूप पहातां नंदाघरीं पूर्ण ।
यशोदा जीवन कॄष्णबाळ ॥२॥
साधितां साधन न पविजे खूण ।
तो बाळरूपें कृष्ण नंदाघरीं ॥३॥
निवृत्ति संपन्न सेवी गुरुकृपा ।
गयनीच्या द्विपा तारूं गेलें ॥४॥

सरलार्थ:

केवलाद्वैत, विशिष्टाद्वैत, द्वैताद्वैत, शुद्धाद्वैत इत्यादी वेदान्त जेथे थांबले आहेत व वेदातील सिद्धान्तहि नाहिसे झाले आहेत ।।१।। ते रूप नंदाच्या घरी पूर्णत्त्वाने यशोदेचे जीवन होऊन कृष्णाच्या बाळवेषांत आहे ।।२।। साधन साधले तरी ज्याचे वर्म सापडत नाही तो श्रीकृष्णाच्या बाळरुपांत नंदाघरी नांदत आहे ।।३।। सर्वांग संपन्न निवृत्ति गुरूकृपेने ते सेवन करीत आहे. गहिनीनाथांच्या बेटावर माझी नांव गेली आहे ।।४।।

भावार्थ:

वेदांतांत सिध्दांत असतात पण त्या पैकी एक ही ब्रह्मस्वरुपाचे यथार्थ वर्णन करु शकत नाही वेदांची धाव तेथे खुंटते. चारी वाणी ही त्याचे वर्णन करु शकत नाहीत. जे स्वरुप वेद पाहू शकले नाही ते नंदा घरी कृष्ण होऊन अवर्तिण झाले व तेच स्वरूप यशोदेचे जीवन झाले. त्या नंदा घरी आलेल्या कृष्ण स्वरुपाला समजण्यासाठी साधना केली तरी ते कळत नाही. निवृत्तिनाथ म्हणतात श्री गुरु गयनीनाथांचा ज्ञानरुपी दिपस्तंभामुळे माझा परमार्थचा प्रवास संपन्न झाला.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *