०५२ तेथें नाहीं मोल मायाचि गणना

तेथें नाहीं मोल मायाचि गणना ।
आपण येसणा ब्रह्मघडु ॥१॥
तें रूप साजिरें निर्गुण साकार ।
देवकी बिढार सेवियेले ॥२॥
नसंपडे ध्याना मना अगोचर ।
तो गोपवेषधर गोकुळीं रया ॥३॥
निवृत्ति धर्मपाठ गयनी विनट ।
कृष्ण नामें पाठ नित्य वाचा ॥४॥

सरलार्थ:

जेथे मोजमापाची संख्या चालत नाही आपणच आपल्या ठिकाणी ते ब्रह्मस्वरूप आहे ।।१।। ते सुंदर रूप निर्गुण साकार असून त्याने देवकिचे घरी वास्तव्य केले आहे. ।।२।। जो ध्यानाला सांपडत नाही व मनाला ही कळत नाही तो गोपाचा वेष धारण करून गोकुळांत राहत आहे ।।३।। सद्गुरु गहिनीनाथांची शरणागती हा निवृत्तिचा धर्म आहे. त्यामुळे कृष्ण नामाचा पाठ नित्यानेच वाणीत आहे ।।४।।

भावार्थ:

त्याच्या स्वरुपाचे मोल करण्यास माया ही थिटी आहे. आपण किती ही केले तरी त्याच्या स्वरुपाला पोहचु शकत नाही. त्यास ब्रह्मस्वरुपाचे सगुण साकार रुप देवकीनी भोगले, जे स्वरुप ध्यान करुन ही सापडत नाही ते विनासायास गोपवेश घालुन गोकुळात आले. निवृत्तिनाथ म्हणतात जे धर्मपीठ श्री गहिनीनाथांनी भुषवले. त्या पिठात सतत कृष्णनामाचा घोष होतो.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *