०५७ वैकुंठ कैलास त्यामाजी आकाश

वैकुंठ कैलास त्यामाजी आकाश ।
आकश‍अवकाश धरी आम्हा ॥१॥
तें रूप सुघड प्रत्यक्ष उघड ।
गौळियासी कोड कृष्णरूप ॥२॥
न दिसे निवासा आपरूपें दिशा ।
सर्वत्र महेशा आपरूपें ॥३॥
तारक प्रसिद्ध तीर्थ पै आगाध ।
नामाचा उद्धोध नंदाघरीं ॥४॥
प्रकाशपूर्णता आदिमध्य सत्ता ।
नातळे तो द्वैताद्वैतपणें ॥५॥
निवृत्तिसाधन कृष्णरूपें खुण ।
विश्वीं विश्वपूर्ण हरि माझा ॥६॥

सरलार्थ:

वैकुंठ लोक व कैलासात जे आकाश त्या आकाशातील अवकाश-पोकळी आम्हास धरते आहे ।।१।। ते स्वरूप सुघड सुंदर आकारात स्पष्ट रूपाने मुर्तिमंत झाल्याने हे कृष्णरूप गौळीयांचा आश्चर्याचा विषय झाला आहे. ।।२।। ज्याचे राहाणे दिसत नाही ते आपणहून देश कालात आपणच सर्वत्र महेश्वर रूपांत आले आहे. ।।४।। परिपूर्ण प्रकाश आरंभी व मध्ये आणि अंतिही त्याचीच सत्ता असून तो द्वैत व अद्वैता अभिनिवेशाने प्राप्त होत नाही ।।५।। (द्वैत अद्वैतनिरपेक्ष स्वयंभ अद्वैत स्वरूप ते आहे) या विश्वामध्ये पूर्णत्वाने भरलेला माझा हरिच आहे रूपाचे रहस्य-सार हेच निवृत्तिचे साधन आहे, सेवन आहे ।।६।।

भावार्थ:

वैकुंठलोक व कैलासलोक ज्या अवकाशात आहे त्यांने आम्हाला धारण केले आहे. तो ज्या जगत स्वरुपात प्रगट झाला तेच कृष्णरुप आहे हे पाहून गौवळी त्याचे कोड पुरवत आहेत. त्याच्या निवास पाहु गेले तर तो सर्वत्र जगत स्वरुपात दिसतो व सुक्ष्म रुपात पाहिले तर स्वतःत दिसतो. जी तीर्थे उध्दाराचे काम करता करता लोप पावली त्यांना तो नंदाघरच्या कृष्ण नामाने जागृत करतो. प्रकाशाची पूर्णता त्याच्याकडे आहे. आदि मध्य अंतावर त्याचे राज्य आहे व तो द्वैता अद्वैतात सापडत नाही. निवृत्तिनाथ म्हणतात तो परमात्मा चराचरात असुन सर्व विश्वात विश्व होऊन असतो.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *