०५८ निरशून्य गगनीं अर्क उगवला
निरशून्य गगनीं अर्क उगवला ।
कृष्णरूपें भला कोंभ सरळु ॥१॥
तें रूप सुंदर गौळियांचे दृष्टी ।
आनंदाचि वृष्ट्सी नंदाघरीं ॥२॥
रजतमा गाळी दृश्याकार होळी ।
तदाकार कळी कृष्णबिंबें ॥३॥
निवृत्ति साकार शुन्य परात्पर ।
ब्रह्म हें आकार आकारलें ॥४॥
सरलार्थ:
निराकार आकाशात अर्क-सूर्य उगवतो तसाच हा श्रीहरि कृष्णरूपाने सरळ कोमल कोंभ गोकुळात आला आहे ।।१।। ते सुंदर रूप गौळ्यांच्या दृष्टीस पडले असून नंदाच्या घरी आनंदाचा वर्षाव झाला आहे ।।२।। रजोगुण व तमोगुण यांना गाळून; तसेच दिसणाऱ्या आकारास नष्ट करून केवळ कृष्णस्वरूपातच सर्वजग दिसत आहे ।।३।। निवृत्तिनाथ म्हणतात हे साकार कृष्ण रूप म्हणजे पलिकडच्याहि पलिकडे असलेले हे परब्रह्म कृष्णाच्या रूपाने आकारास आले आहे ।।४।।
भावार्थ:
शुन्यवत नसलेल्या अवकाशत एक प्रकाशमान सूर्य अवतरला व तोच श्रीकृष्ण रुपात कोंभ पावले. त्या गौळ्यांच्या दृष्टीने सावळ्या सुंदर असलेल्या कृष्णाने नंदाघरी आनंदाचा पाऊस पाडला. त्याच कृष्ण रुपावर एकत्व केल्यावर दृष्याकार रजो व तमो गुणांची होळी होते. सत्व कृष्ण रुपाने उरते. निवृत्तिनाथ म्हणतात ते रुप परात्पर शुन्या पलिकडील आहे व तेच कृष्ण रुपाने साकारले आहे.