०६० ज्या नामें अनंत न कळे संकेत
ज्या नामें अनंत न कळे संकेत ।
वेदाचाही हेत हारपला ॥१॥
तें रूप सानुलें यशोदे तान्हुलें ।
भोगिती निमोले भक्तजन ॥२॥
अनंत अनिवार नकळे ज्याचा पार ।
जेथें चराचर होतें जातें ॥३॥
निवृत्तिसंकेत अनंताअनंत ।
कृष्णनामें पंथ मार्ग सोपा ॥४॥
सरलार्थ:
ज्याला अनंत नामे आहेत, ज्याच्या रूपाने अनंताची खूणहि कळत नाही. वेदाचा उद्देशही जेथे नाहिसा झाला ।।१।। ते परब्रह्म यशोदेचे तान्हे असे बाळरूप आहे व ते भक्त जनाना मोलावांचुन भोगावयास मिळाले ।।२।। त्याचे अनंतपण कोणासहि नाकारता येत नाही. तो अनंत आहे हे अनिवार्यच आहे. कारण त्याचा अंतपारच कळत नाही. ज्याच्या स्वरूपात हे चराचर विश्व होते व जाते ।।३।। तो अनंताहूनहि अनंत आहे. हा निवृत्तिचा सिद्धांत आहे व कृष्ण नामाने हा महामार्ग सोपा आहे ।।४।।
भावार्थ:
अनंत नाम असणाऱ्या परमात्याचे यथार्थ वर्णन करायला वेदांचा ही विचार खुंटला, तो परमात्मा यशोदेच्या घरी तान्ह्या रुपात आल्यावर भक्तांना ही विनासायास त्याचा लाभ झाला अनंत व अनिवार रुपाच्या परमात्माचा पार लागत नाही. त्याच्यात अनेक चराचरे घडत व बिघडत असतात निवृत्तिनाथ म्हणतात अनंत असलेला परमात्मा जाणण्याचा उपाय म्हणजे कृष्णनामपंथ होय.