०६१ विश्वाद्य अनाद्य विश्वरूपें वंद्य
विश्वाद्य अनाद्य विश्वरूपें वंद्य ।
आणि हा अभेद भेद नाहीं ॥१॥
तें रूप साजिरें नंदाचें गोजिरें ।
यशोदे निर्धारे प्रेमसुख ॥२॥
हारपती दिशा सृष्टीचा कडवसा ।
आपरूपें कैसा वोळलासे ॥३॥
निवृत्तिसाधन वसुदेवखूण ।
गोपिकाचें धन हरी माझा ॥४॥
सरलार्थ:
सर्व विश्वाचा आदि असून त्याच्या आदि मात्र कोणीच नाही. (मायबाप रहित लेकुरवाळा) व विश्वाच्या रूपानेच तो वंदनीय आहे. तेथे अभेद भेद हे दोन्ही नाहीत ।।१।। ते सुंदर रूप नंदाचे गोजिरवाणे यशोदेचे निश्चयाने प्रेमसुख आहे. ।।२।। जेथे सर्व दिशा नाहिशा झाल्या व या सृष्टिचा आभासहि नाहिसा होतो. ते स्वरूप आपण होऊन कसेबरे गोकुळात आले ।।३।। ते निवृत्तिचे जे साधन आहे ते वसुदेवपुत्र म्हणून व त्याची ओळख व गोपगोपींचे धन असा हा माझा श्रीहरि आहे ।।४।।
भावार्थ:
हा परमात्मा विश्वाचा आरंभ आहे. विश्वरुपाचे दर्शन घडवणारा वंद्य आहे. त्याला आदि मध्य अंत देश काल हे भेदाभेद नाहीत. ज्या रुपावर नंदाचे प्रेम जडले ते कृष्ण रुपावर यशोदा ही प्रेमासक्त आहे. जेथे दिशाज्ञान व जगत ज्ञान हारपते तोच जीवनदाता पाण्याच्या व प्रकाशाच्या कवडस्याच्या रुपाने प्रतित होतो. निवृत्तिनाथ म्हणतात तोच परमात्मा वसुदेवाची ठेव व गोपीचे धन बनुन नंदाकडे आहे.