०६६ मध्यबिंदनाद उन्मनि स्वानंद

मध्यबिंदनाद उन्मनि स्वानंद ।
रूपरस गोविंद गुणनिधी ॥ १ ॥
तें रूप सुरवर सेविती अरुबार ।
नित्यता सविचार भोगिताती ॥ २ ॥
गौळिया गोजिरें दैवत साचारें ।
नंदासि एकसरे प्रेम देत ॥ ३ ॥
निवृत्ति निवाला प्रेमरसें धाला ।
सर्व सुख डोळा हरिकृष्ण ॥ ४ ॥

सरलार्थ:

मध्यमा वाणीचा आवाज व उन्मनी या पांचव्या अवस्थेतील आत्मानंद, स्वात्मस्वरूप, स्वानंदस्वरूप व गुणांचा साठाच असा गोविंद आहे ।।१।। ते सुंदर रूप देव श्रेष्ठ विचाराने सतत सेवन करतात व त्याचा उपभोगहि घेतात ।।२।। ते नाजुक सुंदर रूप गौळ्यांचे दैवत बनले हे खरे आहे. नंदाला तर एक सारखे प्रेम देत आहे ।।३।। त्या प्रेमसुखाने निवृत्ति तृप्त होऊन शांत झाला आहे. ते सर्व सुख हरि-कृष्णाच्या रूपाने डोळ्यांना दिसत आहे. ।।४।।

भावार्थ:

मध्य बिंद म्हणजे ॐकाराचा वरचा बिंदु ज्याला शुन्य म्हणा पण ह्या शुन्यात निर्मिती आहे. किंबहुना येथुन सुरवात आहे. ते स्थान शरिरात दोन डोळ्यामध्ये आहे तेथे उन्मनी अवस्थेत जो ब्रह्मानंद होतो तो स्वानंद सकल गुणाचा स्वामी गोविंद आहे. त्याच रुपा नित्य स्मरण करुन सुरवर सुख अनुभवतात, ते गोजिरे दैवत गोकुळात गौळी व नंद यांना प्रेम देत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ते सर्व गोकुळातील सुख मी माझ्या डोळ्यानी पाहिल्यामुळे निवांत झालो आहे.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *