०६८ विश्वंभरमूर्ति विश्वाचे पाळक
विश्वंभरमूर्ति विश्वाचे पाळक ।
वैकुंठव्यापक जीवशिव ॥ १ ॥
तें रूप सुंदर नंदाघरीं वसे ।
जनीवनीं वसे कृष्णरूप ॥ २ ॥
निखळ निघोट नितंब परिपूर्ण ।
आनंदपुर्णघन गोपवेषें ॥ ३ ॥
निवृत्ति परिकर वैकुंठ अपार ।
भाग्य पारावार यशोदेचें ॥ ४ ॥
सरलार्थ:
जी विश्वंभर परमेश्वराची मूर्ति विश्वाचे पालन पोषण करणारी असून वैकुंठ व जीवशिवात व्यापून आहे ।।१।। तेच सुंदर रूप नंदाच्या घरी वास करते व जनावनात कृष्ण रूपाने राहते ।।२।। जे शुद्ध, कोंदुन भरलेले, कटिप्रदेशयुक्त व परिपूर्ण आनंदाने दाटलेले ते गोपाच्या वेषात वावरत आहे ।।३।। निवृत्तिनाथ म्हणतात – हा वैकुंठ रूप श्रीहरि अमर्याद विस्तारलेला खरा पण यशोदेच्या भाग्याने तो मर्यादित झाला आहे. साकार झाला आहे ॥४॥
भावार्थ:
विश्वाचे भरणपोषण तो परमात्मा विश्वाचा पालक आहे तो वैकुंठा पासुन जीवशिवा पर्यंत सर्वत्र तोच आहे. जनीवनी असलेले ते सर्वव्यापक रूप कृष्णरुपाने गोकुळात नंदाघरी आले. तो नितळ, निघोट परमात्मा कंबरेला पितांबर बांधुन गोपवेशात साकार झाला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ज्या सुंदरतेला मर्यादा नाहीत असा तो परमात्मा यशोदेचे मुल होऊन गोकुळात राहतो हे तिचे भाग्य आहे.