०७० ज्याचे स्मरणें कैवल्य सांडणें

ज्याचे स्मरणें कैवल्य सांडणें ।
एका नामें होणें चतुर्भुज ॥ १ ॥
तें रूप वैकुंठ भोगिती गोकुळीं ।
नंदाचिये कुळीं बाळकृष्ण ॥ २ ॥
न संपडे ध्यानीं लावितां उन्मनी ।
तो गोपाळाचे कानीं सांगे मातु ॥ ३ ॥
निवृत्ति अरुवार कृष्णरूपी सेवी ।
मन ठाणदिवी ह्रदयामाजी ॥ ४ ॥

सरलार्थ:

ज्या श्रीहरिच्या स्मरण सुखात कैवल्य सुखहि बाजुला सारले जाते व ज्याच्या एका नामानेच चतुर्भूजरूप होता येते ।।१।। ते वैकुंठरूप श्रीहरिचे रूप गोकुळांत सर्वजण भोगित आहेत. नंदाच्या कुळांत तो बाळकृष्ण रूपांत आहे ।।२।। जो योग्यांना ध्यानात व उन्मनी अवस्थेत हि सापडत नाही तो गोपाळांशी कानगोष्टी करीत आहे ।।३।। निवांतपणे निवृत्ति त्या सुंदर कृष्णरूपाचे सेवन करीत आहे व त्या हृदयस्थ स्थानदिपाचे हृदयात स्मरण करीत आहे ।।४।।

भावार्थ:

ज्या चतुर्भुज रुपाच्या नामाचे स्मरण जरी केले तरी त्या पुढे वैकुंठतील कैवल्याला ही फिकेपण येते. नंदाच्या घरी अवतरलेल्या त्या रुपामध्ये गोकुळाचे जन बैकुंठाचे सुख भोगतात. जे उन्मनी अवस्थेत समाधी लावलेल्यांच्या ध्यानात सापडत नाही ते रुप गोपाळाच्या कानाशी हितगुज करते. निवृत्तिनाथ म्हणतात मी त्या रुपाच्या लामणदिवा बनवुन माझ्या हृदयात स्थापन केला व त्या योगे ज्ञानप्रकाश सुख उपभोगत आहे.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *