०७४ गगनीं वोळलें येतें तें देखिलें
गगनीं वोळलें येतें तें देखिलें ।
दर्पणीं पाहिलें बिंबलेपण ॥ १ ॥
तें रूप सुरूप सुरूपाचा विलास ।
नामरूपी वेष कृष्ण ऐसे ॥ २ ॥
सांडुनी धिटिंव जालासे राजीव ।
सर्वत्र अवेव ब्रह्मपणें ॥ ३ ॥
निवृत्ति घडुला सर्वत्र बिंबला ।
दर्पण विराला आत्मबोधीं ॥ ४ ॥
सरलार्थ:
महाकाशात हे स्वरूप असलेले हे कृष्णरूप गोकुळांत आलेले पाहिले व तेच आरशांत आकाश प्रतिबिंबीत व्हावे तसे आपणच कृष्णरूपात साकार झाले ।।१।। ते सुंदर रूप रूपाची शोभा जणू कृष्णाच्या नामरूपांत व वेषात नटली आहे असे दिसते ।।२।। ज्ञानदृष्टी सोडून ते सुंदर कमळासारखे गोजिरवाणे झाले आहे. त्यामुळे सर्वव्यापक ब्रह्म सावयव झाले आहे ।। ३।। गयनी कृपेने घडलेला निवृत्ति सर्वत्र प्रतिबिंबीत झालेले ब्रह्म पाहून त्या आत्मबोधात आरसा-उपाधि विसरून गेला आहे. वेदांताच्या भाषेत उपाधिचा निरास करून अधिष्ठान स्वरूप झाला आहे. ॥४॥
भावार्थ:
जसे दर्पणात पाहिले तर स्वस्वरुप दिसते, तसे परमात्म्याचे विश्वात्मक स्वरुप गगनी प्रकाश रुपाने भासते. त्याच विश्वात्मक रुपाने कृष्णावतारात सुंदर देखणे असे सावळे रुप घेतले आहे. व ते रुप धारण करुन धिटाईने राज्यकारभार पाहिला तरी त्याचे सर्व अवयव ब्रह्म स्थितीच होते. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या स्वरुपाचे सर्वात्मक घटांत प्रतिबिंब दिसते. त्याच परमात्म्याचे ज्ञान होते ह्या भावनेचा लय त्याच्या स्वरुपात होतो.