०७९ निरासि निर्गुण नुमटे प्रपंच

निरासि निर्गुण नुमटे प्रपंच ।
विषयसुक साच नाहीं नाहीं ॥ १ ॥
तें रूप गोजिरें कृष्णमूर्ति ठसा ।
तो गोपाळ समरसा माजि खेळे ॥ २ ॥
चित्ताची राहाविते आपणचि द्रष्टें ।
नेतसे वैकुंठा नाम घेतां ॥ ३ ॥
निवृतिसी ध्यान सर्व जनार्दन ।
वैकुंठ आपण गोपीसंगें ॥ ४ ॥

सरलार्थ:

निराकार निर्गुण स्वरूपांत प्रपंच उमटत नाही. व तेथे विषयाचे सुखही सत्य वाटत नाही ।।१।। ती अति कोमल कृष्णरूपाने साकारलेली मूर्ति गोपाळामध्ये समरस होऊन खेळत आहे ।।२।। आपणच द्रष्टा असून चित्तास जखडून टाकते व त्याचे नाम घेतले असता वैकुंठास नेते ।।३।। सर्वजण हे जनार्दन स्वरूप आहे असे तीचे निवृत्तिस ध्यान आहे तो वैकुंठ स्वरूप श्रीकृष्ण गोपींच्या संगतीत आहे ।।४।।

भावार्थ:

ते गुणातीत परब्रह्म जे निर्गुण आहे. त्यामुळे त्याचा विषयसुखाशी संबंधच येत नाही. हे नाही शब्दाची द्विरोक्ती करून सांगतात. तेच निर्गुणरुप सगुण साकार कृष्णरुप घेऊन गोपाळांबरोबर त्यांच्या सारखे होऊन खेळ खेळत आहे. ते रुप चित्तात राहते व आपण आपणास पाहते व त्याचे धारण चित्तात करुन नामसाधना करणाऱ्या साधकास वैकुंठात नेते, निवृत्तिनाथ म्हणतात, तो परमात्मा गोपीसंगे राहतो त्याचे ध्यान केले की तो सर्व जनात प्रतित होतो.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *