०८२ अरूप बागडे निर्गुण सवंगडें
अरूप बागडे निर्गुण सवंगडें ।
खेळे लाडेंकोडे नंदाघरीं ॥ १ ॥
तें रूप संपुर्ण यशोदा खेळवी ।
कृष्णातें आळवी वेळोवेळां ॥ २ ॥
सागरजीवन सत्रावीची खुण ।
मेघ ती वर्षण वोळलीसे ॥ ३ ॥
निवृत्तिचें धन गोकुळीं श्रीकृष्णां ।
गयनी सहिष्णु प्रेमें डुल्ले ॥ ४ ॥
सरलार्थ:
रूपरहित असून सृष्टिरूपाने खेळणारे व निर्गुणाचे संगतीत राहणारे, हे कृष्णरूप नंदाच्या घरी खेळत आहे ।।१।। त्या कृष्णरूपास यशोदामाता पूर्णपणे खेळवीत आहे व वारंवार कृष्णा कृष्णा म्हणून हाक मारत आहे ।।२।। समुद्रासारखे अतिखोल, स्वरूप समाधी-आत्मकलेची खूण, पंच ज्ञानेद्रिये, (पंचकर्मेद्रिय, पंचप्राण असे पंधरा व सोळावे मन आणि सतरावी आत्मकला) तिचेच चिन्ह असलेला वर्षाव करणारा मेघच प्रसन्नपणे वर्षाव करीत आहे (निर्गुणाचे सगुण होणे म्हणजे समुद्राने मेघ होऊन वर्षाव करणे होय) ।।३।। गोकुळातील श्रीकृष्ण रूप हेच निवृत्तिचे धन आहे. व त्या योगे माझा सहनशील सद्गुरू श्रीगहिनी प्रेमाने डोलत आहे ।।४।।