०८५ ब्रह्मांड करी हरि ब्रह्म झडकरी
ब्रह्मांड करी हरि ब्रह्म झडकरी ।
तें नंदयशोदेघरीं खेळतसे ॥ १ ॥
त्रैलोक्यदुर्लभ ब्रह्मांदिका सुलभ ।
रुक्मिणीवल्लभ कृष्ण सांवळा॥ २ ॥
हिरण्याक्ष वधूनि दाढेवरी मेदिनी ।
तो हा चक्रपाणी यशोदेचा ॥ ३ ॥
रामावतारु गाढा दशशिरा रगडा ।
रिठासुर दाढा तेणेंपाडें ॥ ४ ॥
चतुर्भुज श्रीपति सुकुमार साजती ।
शंख चक्रांकिती हरि माझा ॥ ५ ॥
निवृत्ति ध्यानशूर सर्वरूपें श्रीधर ।
जिंकिला भौमासुर रणयुद्धीं ॥ ६ ॥
सरलार्थ:
हा ब्रह्मस्वरूप श्रीहरि अनंत ब्रह्मांडे निर्माण करतो व त्यांचा झालेला विस्तारहि त्वरीत नाहिसा करतो. तोच नंद यशोदेच्या घरात खेळत आहे ।।१।। ब्रह्मदेवादिकांना जो भावनेने सुलभ व अभिमानाने तो त्र्यैलोक्यातहि दुर्लभ आहे तोच हा रूख्मिणीपति सावळा श्रीकृष्ण आहे. ।।२।। हिरण्याक्ष राक्षसाचा नाश करून वराहावतारात पृथ्वीला दाढेवर धरून वर काढली तोच हातात सुदर्शनचक्र असलेला यशोदेचा बाळ झाला आहे ।।३।। तो बलवान रामावतारांत दहा मस्तकाच्या रावणाचा रगडा करणारा व त्याच प्रमाणे रिठासुरास दाढांनी रगडून टाकणारा-त्याचे चूर्ण करणारा आहे ।।४।। त्या लक्ष्मीपति श्रीकृष्णास ते अतिकोमल मृदु असलेले चार हात शोभून दिसतात ज्या चारहि हातात शंख, चक्र, गदा, पद्म आहेत असा तो माझा हरि आहे ।।५।। त्या लक्ष्मीसंपन्न श्रीकृष्णाचे अति गोड असे ध्यान सर्वरूपाने निवृत्तिस आहे. ज्याने भौमासुरास रणांगणामध्ये जिंकुन घेतले आहे ।।६।।
भावार्थ:
ज्या ब्रह्मांडाची निर्मिती त्या हरिने त्वरित केली तो नंद यशोदोच्या घरात खेळणारा हरिच आहे. तो रुक्मिणीचा पती सावळा कृष्ण त्रैलोक्याला अवघड व ब्रह्मादिकांना सोपा झाला आहे. दाढेवरी पृथ्वीचे हरण करणारा हिरण्याक्ष मारणारा तोच यशोदेचा कुंवर आहे. रामअवतारात दशानन रावणाला मारणारा व बैल झालेल्या रिठासुराच्या दाढा उपटणारा तोच आहे. तोच शंखचक्र घेतलेला सावळा सुकुमार माझा हरि आहे निवृत्तिनाथ म्हणतात त्याच शुर हरिने भौमासुराचा म्हणजेच नरकासुराचा वध केला.