०८७ बिंबीं बिंबीं येक बिंबलें सम्यक
बिंबीं बिंबीं येक बिंबलें सम्यक ।
आपण तिन्हीलोक एक्यारूपें ॥१॥
तो कृष्णरूप ठसा गोपाळां लाधला ।
सर्वत्र देखिला चतुर्भुज ॥२॥
निळिमा अंबरीं निजवर्ण तेज ।
गोपाळ सहज बिंबाकार ॥३॥
निवृत्ति परिपाठा नीळवर्ण खरा ।
नंदाचिया घरा कृष्ण आले ॥४॥
सरलार्थ:
एकले एक बिंब-स्वरूप-आपल्याच स्वरूपात आरशावाचुन बिंबले आहे, चांगले आकारास आले आहे. मायेवांचुन स्वलीलेनेच विलासले आहे. हे जग चैतन्याचाच विलास आहे. अशी निवृत्तिनाथांची अनुभूति आहे. तो आपण स्वत: त्र्यैलोक्यरूपाने एकटाच झाला आहे ।।१।। ती कृष्णमूर्ति गवळ्यांना लाभली असून ते त्या चतुर्भुज श्रीकृष्णास सर्वच ठिकाणी पाहात आहेत ।।२।। आकाशातील निळेपणा व निळ्यारंगाचेच साकारलेले तेज जो गोपाळ श्रीकृष्ण सहजच बिंबाकार आहे ।।३।। श्रीकृष्ण बिंबाचेच आकार आहे. (पण मायारूप उपाधिच आरशावांचुन) निवृत्तिच्या ओळखीचा, परचियाचा तो शुद्ध, सात्विक, निळ्या रंगाचा सावळा नंदाच्या घरी आला आहे ।।४।।
भावार्थ:
बिंबातील बिंब म्हणजे चिदाकाशातील परमात्मा हा तिन्ही लोकात एकत्वाने समप्रमाणात राहतो. तेच मुळचे चतुर्भुज असणारे स्वरुप श्रीकृष्ण होऊन गोपाळांत राहतो. निळवर्ण बिंबाचे रुपात आपण जे पाहतो ते ह्याच्या निळवर्णी छाये मुळेच आकाशाला निलवर्ण प्राप्त झाला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात नंदाच्या घरी आलेल्या निलवर्ण परमात्मा मुळे मला सर्वत्र निलवर्णाचे आवरण पडल्या सारखे वाटते.