०८९ गोकुळीं वैकुंठ वसे गोपाळांमाजी
गोकुळीं वैकुंठ वसे गोपाळांमाजी ।
सौरसें अभक्ता न दिसे काय करूं ॥१॥
पूर्वपुण्य चोखडें ब्रह्मांड कोडें ।
तो यशोदेकडे शोभे कैसा ॥२॥
वसुदेव आपण देवकीये समीप ।
वैकुंठीचें दीप लाडेंकोडें ॥३॥
उग्रसेन संप्रधार केला राज्यधर ।
यादव परिवार रामकृष्ण ॥४॥
द्वारकानाथ हरि सोळासहस्त्र नारी ।
बळिराम परिवार हरि माझा ॥५॥
निवृत्ति जीवन ध्यान एक रामकृष्ण ।
उच्चारणी कोटि यज्ञ होती नामें ॥६॥
सरलार्थ:
गोकुळांत त्या गोपाळामध्ये मूर्तिमंत वैकुंठ स्वरूप श्रीकृष्णरूपाने राहत होते. मात्र ते भक्त नसलेल्यास दिसत नाही याला काय करावे ।।१।। यांची पूर्वपुण्याई शुद्ध असल्याने ब्रह्मस्वरूपच श्रीकृष्णरूपाने कसे बरे लाडाने व कोडकौतुक स्विकार करीत यशोदे जवळ कसे बरे शोभत आहे ।।२।। वसुदेव देवकीच्या पूर्वपुण्याईने त्यांच्या जवळ वैकुंठातील दीपच लाडकेपणाने कोडकौतुकाने वावरत आहे ।।३।। ज्याने रामकृष्णमय झालेल्या यादव परिवारातील पूर्वापार राजसत्ताधारी उग्रसेनास राज्याभिषेक केला ।।४।। तो माझा श्रीहरि, बंधु बळीराम व सोळा हजार स्त्रिया-पत्नी परिवारासह द्वारकेचा राजा झाला ।।५।। निवृत्ति जीवनाचे रामकृष्ण नाम हे एकच ध्यान असून त्याच्या नामोच्चाराने कोटीकोटी यज्ञ होतात ।।६।।
भावार्थ:
भक्तीहीन मनुष्याला गोकुळात तो गोपाळ बनुन राहतो हे कळत नाही. त्याची योग्यता ही दिसत नाही. चोख पूर्व पुण्यामुळे त्याने बनवलेल्या ब्रह्मांडाचे कोडे सुटते. व तोच परमात्मा यशोदेच्या कडेवर शोभुन दिसतो. तो वैकुंठदिप परमात्मा मोठ्या लाडाकोडाने देवकी वसुदेवाजवळ जन्माला आला.त्याच परमात्माने संपूर्ण यादवामधुन संयत व संयमी असलेल्या उग्रसेनाला राज्यावर बसवले. बळिरामाचा लहान भाऊ असुन ही द्वारकानाथ म्हणणाऱ्या परमात्म्याने कैदेतुन सोडवल्या सोळा सहस्त्र स्त्रीयांचा उध्दार केला.निवृत्तिनाथ म्हणतात, अश्या परमात्माच्या रामकृष्ण नामउच्चारणा मुळे कोटी यज्ञांचे फळ मिळते.