०९१ हें व्यापूनि निराळा भोगी वैंकुंठ सोहळा

हें व्यापूनि निराळा भोगी वैंकुंठ सोहळा ।
नंदाघरीं गोपाळा हरि माझा ॥१॥
न साहे सगुण अवघाचि निर्गुण ।
तो कृष्ण आपण गोपाळवेषें ॥२॥
गायी चारी हरि मोहरी खांद्यावरी ।
वेणु नाना परि वातु असे ॥३॥
निवृत्ति गयनी कृपा जपतो अमुप जाण ।
सांगीतली खूण गोरक्षानें ॥४॥

सरलार्थ:

हे सर्व ब्रह्मांड व्यापून अलिप्त असेलला वैकुंठाचा आनंद भोगणारा, हा माझा श्रीहरि, नंदाच्या घरी गोप वेषांत आहे ।।१।। मात्र तो गुणत्रय सहन करीत नसून संपूर्णतया गुणरहितच आहे. असा श्रीकृष्ण आपण स्वतः गोपाळांच्या संगतीत आहे ।।२।। तो माझा श्रीहरि गायी चारीत असून त्याच्या खांद्यावर घोंगडी शोभत आहे व तो नाना प्रकाराने वेणु वाजवीत आहे ।।३।। सद्गुरू गहिनीनाथाने निवृत्तिस दिलेला कृष्ण नामाचा जप हा अमर्याद फल स्वरूप आहे (जो गोरक्षनाथांनी लक्षणपूर्वक त्यांना दिला). ।।४।।

भावार्थ:

वैकुंठात सुख भोगणारा हा परमात्मा सर्व जागा व्यापुन ही त्या पासुन निराळा आहे तोच परमात्मा गोपाळ बनुन नंदा घरी आला आहे. तो गोपाळ वेशातील कृष्ण जरी सगुण दिसत असला तरी तो कायम सगुण राहात नाही. आपले विहीत कार्य झाले की तो निर्गुणातच जातो. तो परमात्मा कृष्ण बनुन गायी चारताना खांद्यावर घोंगडी घेऊन वेणुतुन अनुहत नाद निर्माण करत आहे. त्या मुळे चराचर मोहरून गेले आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, गोरक्षनाथानी गहिनीनाथाना जे गुह्य ज्ञान दिले ते मला ही गहिनीनाथांच्या कृपाप्रसादामुळे प्राप्त झाले आहे.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *