०९६ देवामुकुटमणि ऐकिजे पुराणीं

देवामुकुटमणि ऐकिजे पुराणीं ।
तो हा चक्रपाणी नंदाघरें ॥१॥
नंदानंदान हरि गौळण गोरस ।
गोकुळीं हृषीकेश खेळतसे ॥२॥
हरि हा सकुमार भौमासुर पैजा ।
वोळलासे द्विजा धर्मा घरीं ॥३॥
निवृत्ति रोकडे नाम फाडोवाडें ।
हरिरूप चहूंकडे दिसे आम्हां ॥४॥

सरलार्थ:

सर्व देवांचा मुकुटमणि – सर्व देव श्रेष्ठ म्हणून पुराणातून ऐकले जाते. तो हातात सुदर्शनचक्र असलेला श्रीहरि नंदाच्या घरांत आहे ।।१।। नंदास सुखविणारा व गौळणींचा आनंदच असणारा तो श्रीकृष्ण गोकुळांत खेळत आहे ।।२।। श्रीहरि हा अतिकोमल मृदु खरा पण तो भौमासुरा बरोबर पैज घेतो व सुदामा ब्राह्मणावर प्रसन्न होतो व धर्माचे घरी तर उष्टावळी काढतो ।।३।। निवृत्तिनाथ म्हणतात- त्या श्रीहरिचे नाम त्वरीत फळ देणारे असून आम्हाला हे हरिरूप सर्व ठिकाणी स्पष्टरूपाने दिसत आहे ।।४।।

भावार्थ:

सर्व देवांचा जो मुकुटमणी आहे असे पुराणे सांगतात तो परमात्मा चक्रपाणी नंदाघरी आहे. तोच हा नंदाचा मुलगा गौवळणींचे गोरस चोरुन खातो तोच गोपाळांबरोबर गोकुळात नाना खेळ खेळतो. तोच श्रीकृष्ण भौमासुराला पैज घेऊन मारुन आला व त्यानेच धर्माराजा घरी उष्टया पत्रावळी उचलत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, मी त्याचे नाम अट्टाहासाने नाम घेतल्याने त्याचेच रुप मला सर्वत्र दिसते.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *