०९९ ब्रह्मांड उतरंडी ज्याचे इच्छे घडी
ब्रह्मांड उतरंडी ज्याचे इच्छे घडी ।
तो उच्छिष्टें काढी धर्माधरीं ॥१॥
देखिला वो माये चक्रभुज स्वभावी ।
वारु ते वागवी अर्जुनाचे ॥२॥
याज्ञिक अर्पिती मंत्राच्या आहुती ।
तो द्रौपदियेप्रति भाजि मागे ॥३॥
निवृत्तिदैवत पूर्ण मनोरथ ।
पांडव कृतार्थ कृष्णनामें ॥४॥
सरलार्थ:
सर्व ब्रह्मांडांच्या उतरंडी ज्या श्रीहरिच्या इच्छेने होतात. तो परमात्त्मा धर्माच्या घरी उच्छिष्टे काढतो ।।१।। अग बाई तो चतुर्भुज श्रीहरि मी सहजच पाहिला तो अर्जुनाचे घोडेहि सांभाळतो ।।२।। ज्याला यज्ञ करणारे याज्ञिक मंत्राच्या आहुती देतात तो श्रीहरि द्रौपदीजवळ भाजीचे पान मागतो ।।३।। निवृत्तिचे मनोरथ या देवाने पूर्ण केले. पांडवांचेहि जीवन श्रीकृष्ण नामामुळे कृतार्थ झाले ।।४।।
भावार्थ:
जशी हंड्यांची उतरंड रचतात तसे हे ब्रह्मांड ज्याच्या इच्छेने रचले गेले तो धर्माच्या घरी उष्ट्या पत्रावळी गोळा करत आहे. हे माझे आई ज्याच्या भुजांवर चक्र आहेत असा तो कृष्ण अर्जुनाची घोडी सांभाळत आहे. ज्याच्या नावे याज्ञिक यज्ञात आहुत्या देतात तो द्रौपदीच्या ताटाला लागलेले भाजीचे पान मागुन खातो व संतुष्ट होतो. निवृतिनाथ म्हणतात, ज्याचे नाम घेत पांडव पुण्यवंत झाले त्याच दैवताचे नाम माझे मनोरथ पूर्ण करतील.