१०२ गगन घोटींत उठि पृथ्वी सगळी दाटी
गगन घोटींत उठि पृथ्वी सगळी दाटी ।
आपणचि पाठी कूर्म जाणा ॥१॥
कांसवितुसार अमृत सधर ।
भक्त पारावार तारियेले ॥२॥
उचलिती ढिसाळ सर्व हा गोपाळ ।
तो यशोदेचा बाळ नंदाघरीं ॥३॥
निवृत्ति सादर हरिरूप श्रीधर ।
आपण चराचर विस्तारला ॥४॥
सरलार्थ:
आकाशाला गिळून टाकणारा व सर्व पृथ्वीत दाटलेला श्रीहरि आपणच नंतर कासव झाला ।।१।। कासवाच्या त्या दाट अमृत तुषाराने अनंत भक्त तारून नेले ।।२।। तो विशाल असा सर्वरूप गोपालकृष्ण नंदाच्या घरी यशोदेचा बाळ झाला आहे ।।३।। निवृत्तिचे आदराचे श्रद्धास्थान असलेला व्यापक श्रीधरच स्वतः चराचरात विस्तार पावला आहे ।।४।।
भावार्थ:
समुद्र मंथनावेळी पर्वताचा व घुसळणीचा भार सहन न झाल्या मुळे पृथ्वी खाली गेली तेंव्हा कासव रुप धरुन पाठीवर पृथ्वी घेऊन तिला आधार दिला. जशी कासवी आपल्या अमृतच्या नजरेने पिल्लांचे पोषण करते तसेच पाठीचा अमृतमय आधार पाठीवर घेऊन पृथ्वीला समुद्रात बुडण्या पासुन वाचवले. तोच कच्छ रुप परमात्मा नंदाघरी कृष्णरुपात आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, चराचरात विस्तारलेला तो श्रीधर हरिरुप घेऊन गोकुळात आहे.