१०६ जयामाजी दीक्षा हारपोनि जाये

जयामाजी दीक्षा हारपोनि जाये ।
द्वैत हेंही ठाये दुजेपणें ॥१॥
तें रूप रोकडें दिसे चहूंकडे ।
गोपाळ संवगडे खेळताती ॥२॥
उपराति योगियां तितिक्षा हारपे ।
मायकार लोपे कृष्णध्यानें ॥३॥
निवृत्ति तप्तर सर्व हा श्रीधर ।
मनाचा विचार हारपरला ॥४॥

सरलार्थ:

ज्याच्या मध्ये अद्वैत बोध विरघळून जातो व दुसरेपणाने दिसणारे द्वैतही थांबते ।।१।। ते द्वैताद्वैतातीत स्वरूप चहूकडे प्रत्यक्ष दिसत आहे. व त्याच्या बरोबर ते खेळगडी गोपाळ खेळत आहेत ।।२।। त्या श्रीकृष्ण ध्यानाने योग्यांना वैराग्य होऊन ती वैराग्य वृत्तिही विलीन होते. व मायेचा आकारहि नाहिसा होतो. ।।३।। सावध असलेल्या निवृत्तिने सर्व ठिकाणी लक्ष्मीपति पाहिल्याने मनाचा विचार नाहिसा करून टाकला आहे. उन्मन अवस्था साधली आहे. ।।४।।

भावार्थ:

त्या अद्वैत स्वरुपात द्वैताला द्वैत होण्यासाठी तसुभर जागा नाही.त्याच रुपात मंत्र देणारा गुरु व मंत्र घेणारा शिष्य ह्यांचा लय होऊन ते त्या ब्रह्मस्वरुपात लीन होतात. ते रुप सगुण साकार होऊन गोपाळांबरोबर खेळत आहे. त्याच स्वरुपात योग्यांना वैराग्य ज्ञान व तितिक्षा ह्यांचा लय करता येतो व माया ही त्याच ठिकाणी ब्रह्मरुप पावते.निवृत्तिनाथ म्हणतात, त्या रुपाच्या सर्वत्र प्रगट होण्याने मन त्या श्रीधर रुपात मग्न होते.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *