११३ गोत वित्त चित्त गोतासी अचुक
गोत वित्त चित्त गोतासी अचुक ।
चाळक पंचक तत्त्वसार ॥१॥
तें जप सादृश्य कृष्णनाम सोपें ।
नंदायशोदाखोपें बाळलीला ॥२॥
निरसूनि गुण उगविली खूण ।
गोकुळी श्रीकृष्ण खेळे कैसा ॥३॥
निवृत्तिचें सार कृष्णनामें पार ।
सर्व हा आचार हरीहरी ॥४॥
सरलार्थ:
सर्वांचे गोत, वित्त व चित्त या गोतावळ्याचे समुदायाचे बिनचूक चालना देणारे-चालविणारे व पांच तत्त्वाचे-महाभूतांचे सार आहे. तात्पर्य – रहस्य आहे ।।१।। ते मानवासारखे रूप कृष्णरूपाने सुलभ होऊन नंद यशोदेच्या खोपट्यात घरांत बाललीला करीत आहे ।।२।। त्रिगुणांचा निरास करून जे स्वरूप स्पष्ट झाले आहे. तो श्रीकृष्ण गोकुळांत कसा खेळत आहे हे पहा ।।३।। कृष्णाच्या रूपाने सर्व विश्वाचा शेवट असे तेच निवृत्तिचे सार – फल आहे ।।४।।
भावार्थ:
जो आपल्या मनाचा, वित्ताचा चालक आहे.आपले गोत कोण असावेत हे ठरवतो तोच पंचकोष व पंचभुतांचा चालक आहे.त्याच परमात्मा श्रीकृष्णाचे नाम येवढे सोपे आहे जेवढ्या त्याच्या बाळलिला नंद यशोदेच्या घरात सहज वाटतात. तिन्ही गुणाचा निरास करुन हे परमात्म स्वरुप गोकुळात उगवले आहे ते गोकुळात अनेक खेळ करुन दाखवत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, ह्या कृष्णनामाने पार होणाचे सार असे आहे की आपला सर्व आचार हरिरुप करणे मग पार होणे सोपे आहे.