११६ मृगजळाभास लहरी अपारा
मृगजळाभास लहरी अपारा ।
हा प्रपंच पसारा उदरीं जया ॥१॥
तें रूप वैकुंठ कृष्णरूपें खेळे ।
गोपाळांचे लळे यमुनातटीं ॥२॥
जाळूनि इंधन उजळल्या दीप्ती ।
अनंतस्वरूपी एक दिसे ॥३॥
निवृत्ति सागर ज्ञानार्क आगर ।
कृष्णाचि साचार बिंबलासे ॥४॥
सरलार्थ:
मृगजळाच्या दिसणाऱ्या असंख्य लाटा म्हणजेच हा प्रपंचाचा विस्तार ज्याच्या सत्तेवर भासत आहे ।।१।। तो वैकुंठस्वरूप श्रीहरि श्रीकृष्णरूपाने खेळत असून यमुनेच्या तीरावर गोपाळांचे हट्ट पुरवीत आहे ।।२।। संसार उपाधिचे इंधन-काष्टे जाळून उजळलेला प्रकाश म्हणजेच तो अनंताचे स्वरूप एकरूपाने दिसत आहे ।।३।। निवृत्तिचा सागर व ज्ञानाचा सूर्य प्रकाशाचा साठाच खरोखर कृष्णरूपांत साकार झाला आहे ।।४।।
भावार्थ:
मृगजळाच्या अमर्याद लाटां प्रमाणे हे मायेच्या पटलात बध्द असलेले ह्या जगताचा पुर्ण पसारा त्याच्या उदरात आहे. तेच रुप कृष्ण रुप घेऊन गोपाळांच्या लळ्यामुळे यमुनाती वैकुठातुन येऊन कृष्णरुप धरुन खेळत आहे. अग्नीत इंधन टाकल्यावर जशा दशदिशा प्रदीप्त होतात पण तो अनंत स्वरुपातील प्रकाश मात्र एकत्वाने जाणवत असतो. निवृत्तिनाथ म्हणतात, तोच परमात्मा ज्ञानार्काचा सागर बनुन त्या सागराला उदरात धरून तोच परमात्मा कृष्ण रुपाने साचार होऊन बिंबला आहे.