११७ गोत वित्त धन मनाचें उन्मन
गोत वित्त धन मनाचें उन्मन ।
निमोनि संपूर्ण तयामाजी ॥१॥
जीवन पावन रसाचें निधान ।
रसरूपें धन रसनेचें ॥२॥
भोग्य भोग भोक्ता आपण तत्त्वता ।
त्याहुनी परता तयामाजि ॥३॥
निवृत्ति आगर कॄष्ण हा सागर ।
सर्वरूपें श्रीधर दिसतसे ॥४॥
सरलार्थ:
सर्व गणगोत व सर्व वस्तु, धन आणि मनाची उन्मन-मनरहित स्थिति हे सर्वच जेथे नाहिसे झाले आहेत ।।१।। ज्याच्या योगाने सर्वांचे जीवन पवित्र होते व जे आनंदाचा ठेवाच असून सर्वाच्या रूपाने रसनेंद्रियाचे धन आहे ।।२।। जो आपणच मूळात भोग्यविषय, भोगसाधन व भोक्ता जीवात्मा असून त्यांच्याहि पलिकडे असून त्यांच्यामध्ये वास करतो. ।।३।। सर्व सुखाचा साठा असा श्रीकृष्ण सागर सर्वरूपाने तो लक्ष्मीपतिच निवृत्तिस दिसत आहे ।।४।।
भावार्थ:
संपत्ती ऐश्वर्य नात्यासारख्यातुन मन बाजुला करुन परमेश्वराच्या सगुणरूपाचा आनंदाने मन शांत झाले आहे. पाण्यातुनच आलेले अनेक चवा जशी जिभाला कळते हेच कळणे म्हणजे जिव्हेचे महाधन आहे जसा भोग्य, भोग, व भोक्ता ह्या त्रिपुटीत आपण तत्वतः बसतो जीव म्हणुन पण हा त्या पासुन वेगळा आहे. निवृत्तीनाथ म्हणतात, हे कृष्णरुप समुद्रा पेक्षा विशाल असुन आशा अनेक समुद्राचे चे ते आगर असुन मला त्या सर्व रुपात तो श्रीधर दिसतो.