१२१ अव्यक्त आकार अकारलें रूप
अव्यक्त आकार अकारलें रूप ।
प्रकाश स्वरूप बिंबलेंसें ॥१॥
तें रूप अव्यक्त कृष्णनाम निज ।
नामाअधोक्षज चतुर्भुज ॥२॥
वर्णासी अव्यक्त वर्णरूप व्यक्त ।
भोगिती वरिक्त नामपाठें ॥३॥
निवृत्तिचे काज नाम मंत्र बीज ।
गयनी सहज तुष्टलासे ॥४॥
सरलार्थ:
अव्यक्त श्रीहरिचा आकार म्हणजेच हे साकारले रूप आहे. चित्प्रकाश प्रभुचेच स्वरूप साकार झाले आहे ।।१।। ते अप्रगट रूपच कृष्णनामाची आवड आहे. चार बाहु असलेल्या अधोक्षज श्रीहरिचे नाम तेच हे श्रीकृष्णनाम आहे ।।२।। जगाच्या नामरूपाने ते अव्यक्त आहे व कृष्णाच्या स्वरूपाने ते व्यक्त आहे व नामाचे पठण करून वैराग्यशील त्याचा उपभोग घेत आहेत ।।३।। आता जगाचे बीजरूप ब्रह्माचे नाम जपणे हेच निवृत्तिचे काम आहे. त्याने सद्गुरू गहिनी सहजच संतुष्ट झाले आहे. ।।४।।
भावार्थ:
ते निर्गुण निराकार रुप कृष्णरुपात सगुण साकारले असुन जसा प्रकाश सर्वत्र बिंबावा तसे भासत आहे.मुळचे अव्यक्त स्वरुपातील ते परमात्मस्वरुप कधी श्रीकृष्ण कधी अधोक्षज भासते. चारी वर्णाला हे रुप स्वतःला लाऊन घेत नाही त्याला रंगरुप नाही असे असले तरी कृष्णनामामुळे ते स्वरुप भोगता येते. निवृत्तिनाथ म्हणतात, माझे नित्यकर्मच कृष्णनामाचा जप करणे झाल्यामुळे सदगुरु गहिनीनाथ संतुष्ट झाले आहेत.