१३५ परेसि परता न कळे पैं शेषा

परेसि परता न कळे पैं शेषा ।
तो गौळिया अशेषा माजी हरी ॥ १ ॥
भाग्य पैं फळलें नंदाघरीं सये ।
यशोदा पैं माय परब्रह्माची ॥ २ ॥
गौळिये नांदती गोधनाचे कळप ।
त्यामाजि स्वरूप कृष्णमूर्ति ॥ ३ ॥
निवृत्तीचें ध्यान गोपाळ आमुचा ।
आतां जन्म कैचा भक्तजना ॥ ४ ॥

सरलार्थ:

परावाणीच्या पलिकडे असलेले ते परब्रह्म सहस्त्रजिभा असलेल्या शेषासहि कळत नाही. तो श्रीहरि सर्व गौळ्यांमध्ये सर्वांगाने आहे ।।१।। अग बाई त्या नंदाच्या घरी भाग्य फलद्रुप झाले आहे. भाग्यच भरभरून आले आहे व ती भाग्यवान यशोदा परब्रह्माची आई झाली आहे. ।।२।। जेथे असंख्य गवळी राहत आहे व गाईंचे कळप आहेत त्यांच्यामध्येही परब्रह्म स्वरूप श्रीकृष्णमूर्ति शोभत आहे ।।३।। आमचा गोपाळकृष्णच निवृत्तिचे ध्यान आहे मग या भक्तजनास जन्म कसा असणार. (जन्ममरणातीत श्रीकृष्णाचे एकरूपतेने ध्यान असल्याने भक्तही जन्ममृत्युच्या पलिकडे जातात.) ।।४।।

भावार्थ:

ज्याच्या स्वरुपाचे वर्णन परा वाणीला करता येत नाही ज्याच्यावर ते स्वरुप आरुढ आहे आशा शेषालाही करता येत नाही ते सगुण रुप धारण करुन गोकुळात आले आहे. हे बुध्दीरुपी मैत्रीणी तेच रुप नंदा घरी आले असुन यशोदेला त्याचे मातापण मिरवायचे भाग्य मिळाले आहे. गौळियांबरोबर नांदतात ते गोधनांचे कळप, ते गोप हे सर्व त्या कृष्णाचे स्वरुप झाले आहेत. निवृत्तिनाथ म्हणतात, त्याचे ध्यान करता करता आम्हाला जन्मच राहिला नाही म्हणजे त्या नामाने आम्हाला जन्म मरणाच्या चक्रातुन बाहेर काढले आहे.


Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *