१३७ न साहात दुजेपण आपणचि आत्मखुण
न साहात दुजेपण आपणचि आत्मखुण ।
श्रुति जेथें संपूर्ण हरपती ॥ १ ॥
देवरूप श्रीकृष्ण योगियां संजीवन ।
तें रूप परिपूर्ण आत्माराम ॥ २ ॥
न दिसे वैकुंठी तें योगियांचे ध्यानबीज ।
तो गोपाळाचें काज हरि करी ॥ ३ ॥
निवृत्ति गयनि हरि उच्चारितां माजीं घरीं ।
होती मनोरथ पुरी कामसिद्धी ॥ ४ ॥
सरलार्थ:
ज्याला दुसरेपणा सहन होत नाही व जो आपणच आपली आत्मखूण आहे. वेदश्रुति जेथे पूर्णपणे हारपून जातात ।।१।। तो वेदरूप बाळकृष्ण योग्यांचे जीवन असून परिपूर्णत्वाने आत्मस्वरूपी रमणारे आहे ।।२।। जो वैकुंठात दिसत नाही व योग्यांचे ध्यान मूळ आहे तो या गोपाळांचे काम स्वतः करीत आहे ।। ३।। गयनीचा निवृत्ति म्हणत आहे की त्या हरिच्या नामाचा जप घरबसल्या जरि केला तरी मनाच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन सर्व कामनांची पूर्तता होते ।।४।।
भावार्थ:
ज्याचे वर्णन श्रुती करु शकत नाहीत ज्याच्या स्वरुपात कोणतेही द्वैत नाही तेच स्वरुप आत्मखुण आहे. तेच देवस्वरुप कृष्णरुप योग्यांना संजिवनी देते तेच रुप हे परिपूर्ण आत्मस्वरुप आहे. जे स्वरुप वैकुंठात दिसत नाही जे स्वरुप योग्यांच्या ध्यानाचे बीज आहे ते सगुण रुपात गोपाळांची काम करत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथांच्या कृपेने मी त्याच नामाचा जप केला त्या मुळे माझे सर्व मनोरथ व इच्छा पूर्ण झाल्या.