१४२ उफराटी माळ उफराटें ध्यान

उफराटी माळ उफराटें ध्यान ।
मनाचें उन्मन मूर्ति माझी ॥ १ ॥
तें रूप आवडे भोगिता साबडें ।
यशोदेसि कोंडें बुझावितु ॥ २ ॥
नहोनि परिमाण हरपलें ध्यान ।
आपणचि रामकृष्ण जाला ॥ ३ ॥
निवृत्तिची जपमाळा हे गोमटी ।
मन तें वैकुंठी ठेवियेलें ॥ ४ ॥

सरलार्थ:

ज्याची जपमाळ उलटी आहे व ध्यानहि उलटेच आहे. अजप हाच त्याचा जप व ध्यानरहित स्थिती हे त्याचे ध्यान आहे व मनाची मनरहित अवस्था ही माझ्या बाळकृष्णाची मूर्ति आहे ।।१।। ते रूप, ते भोळे गवळीजन आवडीने उपभोगतात व यशोदेची ते कौतुकाने समज काढतात ।।२।। त्याचा विस्तारच मोठा असल्याने ध्यान नाहिसे झाले व तो श्रीकृष्ण आपणच सर्वरूपाने झाला आहे. ।। ३।। चांगली जपमाळ हाच निवृत्तिचा जप आहे व त्याने आपले मन वैकुंठ स्वरूप श्रीकृष्णास ठेवले आहे ।।४।।

भावार्थ:

मनाला उन्मनी अवस्थेत त्याची मूर्ती पाहिली की उफराटे ध्यान व उफराटी माळ न जपता ही त्याचा लाभ होतो. येथे महाराज कर्मकांडाचा निषेध करतात. त्याच उन्मनी अवस्थेत निरागस कृष्णरुप पाहताना ते रुप यशोदेचीही कोडी निरसन करताना दिसते. त्याचे ध्यान करताना ध्यानच हारपून जाते व आत्माच स्वयंभ रामकृष्ण बनतो.निवृत्तिनाथ म्हणतात, त्या वैकुंठातील कृष्णाच्या पायावर त्याचेच नाम अर्पण केले की जपमाळ व जप तोच होऊन जातो. त्या परती जपमाळ दुसरी नाही.


Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *