१४५ तारक प्रसिद्ध तीर्थ तें अगाध
तारक प्रसिद्ध तीर्थ तें अगाध ।
नामाचा उद्बोध नंदाघरी ॥ १ ॥
प्रकाश पूर्णता आदिमध्यें सत्ता ।
नातळे तो द्वैताद्वैतपणें ॥ २ ॥
निवृत्ति साधन कृष्णरूपें सुख ।
विश्वीं विश्वरूप हरि माझा ॥ ३ ॥
सरलार्थ:
भगवंताचे नाम हे तारणारे महान तीर्थ आहे. म्हणूनच नंदाच्या घरी हरिनामाचे उद्बोधन सतत चालु आहे ।।१।। आदि, मध्य व अंती प्रकाश व सत्तास्वरूप असे ते ; दुजेपणाने द्वैताचा वारा लागु देत नाही ।।२।। कृष्णरूपाने सुखसेवन हेच निवृत्तिचे साधन आहे व तो माझा श्रीहरि विश्वरूपाने विश्वात व्यापून राहिला आहे. ।।३।।
भावार्थ:
जगाचे तारक तीर्थ असलेल्या भगवान श्रीकृष्णाचे नांव घेऊन नंदाच्या गोकुळात लोक एकमेकाला उद्बोध करतात. जो प्रकाशमान करण्याऱ्या सर्व वस्तुंमध्ये प्रकाशच आहे तो द्वैत अद्वैतात आडकत नाही. निवृतिनाथ म्हणतात, विश्वाचे विश्वरुप असणाऱ्या हरिच्या नामाचे साधन बनवल्यामुळे त्या कृष्णाचे सुख मला लाभले आहे.