१४७ आगम निगमा बोलतां वैखरी
आगम निगमा बोलतां वैखरी ।
तो यशोदेच्या करीं धरूनी चाले ॥ १ ॥
न संपडे शिवा बैंसताची ध्यानीं ।
जालिया उन्मनी दृश्य नव्हे ॥ २ ॥
कमळासनीं ब्रह्मा ध्यानस्थ बैसला ।
पाहतां पाहतां मुळा न संपडे ॥ ३ ॥
निवृत्ति गयनी सांगतुसे खुणा ।
तो देवकीचा तान्हा बाळ झाला ॥ ४ ॥
सरलार्थ:
शास्त्रे व वेद, वैखरी वाणीने ज्याचे वर्णन करतात तो श्रीहरि यशोदेचे बोट धरुन चालत आहे ।।१।। ध्यान करून जो भगवान शंकरास सांपडत नाही व उन्मनी अवस्था प्राप्त होऊनही जो अनुभवास येत नाही ।।२।। स्वतः ब्रह्मदेव कमळाच्या आसनावर ध्यान लावून बसला व आपले मूळस्वरूप पाहून पाहूनही त्यास सांपडले नाही ।। ३।। गयनी गुरुंचा निवृत्ति त्यांच्या खुणा सांगत आहे. जो देवकीचे तान्हे बाळ होऊन राहिला आहे ।।४।।
भावार्थ:
ज्याचे वर्णन करणे आगमा निगमाला जमले नाही वेद व श्रुती मौनावल्या तो परमात्मा यशोदेचे बोट धरुन चालतो. महादेव शिव ध्यान लाऊन बसतात तरी त्यांच्ये पुर्ण ते स्वरुप ते पाहु शकत नाहीत, उन्मनी अवस्थेत ही तो त्यांना दिसत नाही. ब्रह्मदेव कमळाच्या आसनावर ध्यानस्त बसुन ह्याला पाहायला गेला तरी ही मुळ स्वरुपात पाहु शकला नाही. निवृतिनाथ म्हणतात. तो परमात्मा देवकीचे तान्हे बाळ झाला ही श्री गुरु गहिनीनाथानी मला त्याची खुण ही सांगितली.