१५७ गगन ग्रास घोटीं ब्रह्मांड हें पोटीं
गगन ग्रास घोटीं ब्रह्मांड हें पोटीं ।
चैतन्याची सृष्टि आपण हरि ॥ १ ॥
देखिलागे माये सुंदर जगजेठी ।
नंदयशोदेदृष्टी ब्रह्म खेळे ॥ २ ॥
आकाश सौरस तत्त्व समरस ।
तो हा ह्रषिकेश गोपीसंगें ॥ ३ ॥
निवृत्ति साधन निरालंबीं ध्यान ।
तोचि हा श्रीकृष्ण ध्यान माझें ॥ ४ ॥
सरलार्थ:
एका घोटातच आकाशाला गिळून हे सर्व ब्रह्मांडच पोटांत घालणारा व चैतन्याचा विस्तार-स्वरूप आपणच असा श्रीहरि ।।१।। अग बाई तो जगात श्रेष्ठ असलेला सुंदर परमात्मा मी पाहिला. ते परब्रह्म नंद यशोदेच्या दृष्टि समोर खेळत आहे. ।।२।। आकाशा संबंधाने हे तत्त्वाचे एकरूप असलेला तोच हा ऋषीकेश श्रीहरि गोपींच्या संगतीत वावरत आहे ।।३।। स्वावलंबी परब्रह्माचे हे ध्यान निवृत्तिचे साधन आहे व त्या परब्रह्माचे रूप श्रीकृष्ण तोच माझे ध्यान आहे ।।४।।
भावार्थ:
ज्याच्या एका घासात गगन हरपते ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांडे आहेत तेच परब्रह्म ह्या जगताचे चैतन्य स्वरुप आहे. नंद यशोदेकडे त्याला खेळताना मी त्या सुंदर जगजेठीला पाहिला. जो एकत्वाने सर्व आकाश बनुन व्यापला आहे तोच हृषीकेश गोपी बरोबर आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, श्रीकृष्ण नाम सोडुन इतर कोणतेही साधनचा उपयोग मी माझ्या ध्यानासाठी करत नाही.