१५८ चिंतितां साधक मनासि ना कळे

चिंतितां साधक मनासि ना कळे ।
तो गोपिकासी आकळे करितां ध्यान ॥ १ ॥
देखिलागे माये सगुणागुणनिधि ।
यशोदा गोविंदीं प्रेम पान्हा ॥ २ ॥
न माये सर्वाघटी आपणचि सृष्टी ।
तो यमुनेच्या तटीं गायी चारी ॥ ३ ॥
निवृत्ति साधन कृष्णाचे रूपडें ।
ब्रह्मांडा एवढें तदाकार ॥ ४ ॥

सरलार्थ:

ज्याचे चिंतन केले असता तो मनास आकळत नाही, तो श्रीहरि गोपिकांच्या ध्यानाने आकळतो. ।।१।। अग बाई तो सगुण व निर्गुण स्वरूपांचा सांठा मी पाहिला. यशोदेला तर गोविंदा करिता प्रेमाचा पान्हा फुटती ।।२।। सर्व शरीरात वस्तूत तो न मानता सृष्टी रूपाने आपणच नटला आहे व तोच यमुनेच्या तिरावर गायी चारीत आहे ।।३।। ते श्रीकृष्ण रूपच निवृतिचे साधन आहे. ते ब्रह्मांडा एवढे असून ब्रह्मस्वरूपाशी एकरूप आहे

भावार्थ:

ज्याचे चिंतन सतत करणाऱ्या साधकाला तो सापडत नाही तो परमात्मा गोपिकांच्या प्रेमभक्तिमुळे सतत त्यांच्या ध्यानात असतो. ज्याला यशोदा आपला प्रेमपान्हा पाजते त्या सगुण गुणनिधीला मी पाहिला. यमुनेच्या तटावर गायी चारणारे ते परब्रह्म सृष्टीतील कोणत्याच स्वरुपात बंधिस्त होत नाही. निवृतिनाथ म्हणतात, त्याच कृष्णरुपाला माझे नामसाधन बनवल्यामुळे सर्व ब्रह्मांड मला तदाकार एकरुप दिसत आहे.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *