१६३ हरिदास संगे हरिदास खेळे

हरिदास संगे हरिदास खेळे ।
ब्रह्मादिक सोहळे भोगिताती ॥ १ ॥
संतमुनिदेवसनकादिक सर्व ।
तिहीं मनोभाव अर्पियेला ॥ २ ॥
पुंडलिकफळ वोळले सकळ ।
शंकर सोज्वळ प्रेमें डुले ॥ ३ ॥
निवृत्ति लोळत चरणरजीं लाटा ।
माजि त्या वैकुंठा आत्मलिंगीं ॥ ४ ॥

सरलार्थ:

श्रीहरिचे सेवक असे संत; त्यांच्या बरोबर हरिभक्त संत रमतात. हरि चिंतन, कथन व एकमेकास बोधाची देव-घेव करतात. हा आनंद सोहळा ब्रह्मदेवादिक भोगतात ।।१।। संत, मुनि, देव व सनकादिक सर्वांनी आपला भक्तिभाव या हरिभक्तांना समर्पण केला ।।२।। त्या सर्वांच्या भक्तिभावालाच पुंडलिक हे फळ सर्वांगाने प्राप्त झाले. अतिशुद्ध असा श्रीभगवान शंकरहि संत पुंडलिकाच्या प्रेमात डोलत आहे ।।३।। आत्मस्वरूपाचीच खूण असलेल्या वैकुंठस्वरूप चरण धूळीमध्ये निवृत्ति निश्चिंतपणे लोळत आहे ।।४।।

भावार्थ:

हरिच्या दासा सोबत घालवलले वेळ हरिदासासाठी जे ब्रह्मादिक सोहळे भोगतात तसाच असतो. हरिदास म्हणजे त्याचे नाम घेणारे संत मुनी देव सनकादिक ज्यांनी आपल्या सर्व इच्छा त्याच्या पायाशी अर्पित केल्या आहेत. त्याच मुळे संत पुंडलिकाच्या कृपेमुळे ते सगुण परब्रह्मचे प्रेम आपल्याला प्राप्त झाले आहे. तेच प्रेम मिळाल्यामुळे महादेव शंकर ही डोलत असतात. निवृतिनाथ म्हणतात, त्या आत्मलिंग असणाऱ्या श्री विठ्ठलाच्या चरणरजांच्या लाटात मी लोळत पडलो आहे.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *