१६४ सोपान संवगडा स्वानंद ज्ञानदेव
सोपान संवगडा स्वानंद ज्ञानदेव ।
मुक्ताईचा भाव विठ्ठलराज ॥ १ ॥
दिंडी टाळघोळ गाती विठ्ठल नाम ।
खेचरासी प्रेम विठ्ठलाचें ॥ २ ॥
नरहरि विठा नारा ते गोणाई ।
प्रेम भरित डोहीं वोसंडती ॥ ३ ॥
निवृत्ति प्रगट ज्ञानदेवा सांगे ।
पुंडलिकसंगे हरि खेळे ॥ ४ ॥
सरलार्थ:
स्वानंद सुखाच्या सोहळ्यात सोपानदेव हे ज्ञानदेवांचे सवंगडी आहेत. मुक्ताईचाही सर्वभाव श्री विठ्ठलच आहे ।।१।। दिंडी व टाळांच्या आवाजांत ते विठ्ठल नामाचा गजर करतात. विसोबा खेचरहि त्या विठ्ठल प्रेमाने रंगलेले आहे ।।२।। नरहरि, सोनार विठा, नारा, व गोणाई हे नामदेवांचे कुटुंब यांच्याहि प्रेमाने भरलेला डोह परिपूर्ण भरून उसळत आहे ।।३।। पुंडलिका बरोबर श्रीहरि खेळत आहे हे निवृत्ति ज्ञानदेवास उघडपणे सांगत आहे ।।४।।
भावार्थ:
सोपे नाम जपणारा सोपान, नित्य स्वानंद स्वरुप प्राप्त करणारे ज्ञानदेव व श्री विठ्ठलावर प्रचंड भाव असणारी मुक्ताई सोबत आहे. विसोबा खेचरासही त्या विठ्ठलाचे प्रेम लाभल्यामुळे हे सर्व टाळ दिंडी घेऊन त्या विठ्ठलाचे नाम घोळवत आहेत. नरहरी सोनार, विठा, नारा ही नामदेवांची मुले व गोणाई हे सुध्दा त्या विठ्ठला नाम डोहात प्रेमभरित झाले आहेत. निवृतिनाथ ज्ञानदेवाला स्पष्ट सांगतात हे ज्ञानराजा तो पुंडलिक श्री विठ्ठलाबरोबर खेळत आहे.