१६७ कमळाच्या स्कंधी गुणी गुढारलें
कमळाच्या स्कंधी गुणी गुढारलें ।
वरी आकारलें फूल तया ॥ १ ॥
सुमनाचेनि वासें भ्रमरभुलले ।
मार्ग पैं विसरले इंद्रियांचा ॥ २ ॥
तैसेहे संत विठ्ठलीं तृप्त ।
नित्य पैं निवांत हरि चरणीं ॥ ३ ॥
नाठवे हें दिन नाठवे निशी ।
अखंड आम्हांसि हरिराजा ॥ ४ ॥
तल्लिन प्रेमाचे कल्लोळ अमृताचे ।
डिंगर हरिचे राजहंस ॥ ५ ॥
टाहो करूं थोर विठ्ठल कीर्तनें ।
नामाच्या सुमनें हरि पुजूं ॥ ६ ॥
निवृत्ति निवांत तल्लीन पै झाला ।
प्रपंच आबोला हरिसंगें ॥ ७ ॥
सरलार्थ:
परब्रह्म कमळाच्या फांदीत सद्गुणांचा गाभा येऊन (पोटरा) वर फुलांचा आकार आला आहे ।।१।। तोच हा श्रीविठ्ठल होय. व त्या फुलाच्या वासाने भ्रमर वेडे झाले असून इंद्रिय सुखाचा रस्ताच ते आता चुकले ।।२।। तसेच हे सर्व संत विठ्ठलात तृप्त झाले व पाडुरंगाच्या चरणारविंदी नित्यानेच शांतपणे राहिले आहे ।।३।। आम्हाला आता दिवस रात्र हे कांही कळत नाही, अखंड त्या विठ्ठल राजातच आम्ही रमलो आहोत ।।४।। अमृताचे तरंग अशा श्रीहरि प्रेमात विलीन होऊन राहिलेले श्रीहरिचे लाडके भक्त राजहंसच आहेत. श्रीहरिच्या प्रेममोत्याशिवाय त्यांचा दुसरा चारा नाही. ।।५।। आम्ही आतां विठ्ठलाच्या नामसंकीर्तनाने मोठा टाहो फोडू व सहस्त्रनामसुमनाने श्रीविठ्ठलाचे पूजन करू ।।६।। निवृत्ति निश्चिंतपणे विठ्ठलाशी एकरूप झाला व त्याच्या संगतीत प्रपंचाचे नांवच विसरला ॥७॥
भावार्थ:
कमळाच्या देठ सकट कमळाची कळी ही देठच वाटते व नंतर कमळ फुलले की ते देठवर नसल्यासारखे वाटते त्या फुलामुळे ते देठ दिसत नाही. कमलदलाच्या सुगंधामुळे ते भ्रमर येवढे मोहित होतात की त्यांच्या इंद्रियाद्वारे लाकुड पोखरण्याचा गुणधर्म विसरतात. तसेच हे संत त्या विठ्ठल नामात तृप्त होतात व त्या विठ्ठल चरणकमलांवर निवांत होतात. त्या हरिनामामुळे ते रात्र व दिवस ही विसरतात. ज्ञान व अज्ञान हा निरक्षीर विवेक असणारे हे विठ्ठलाचे जणु राजहंसच आहेत त्या मुळे ते त्या नामामृत प्रेमाने तल्लिन होतात. हे संत विठ्ठलनामाचा टाहो करुन कीर्तन करतात व त्याच विठ्ठलाच्या नामाने त्याचीच पूजा बांधतात. निवृत्तिनाथ म्हणतात, मी त्या नामचिंतनामुळे प्रपंचाचा निरास करुन त्या नामघोषात निवांतपणे तल्लिन झालो.