१६८ गयनी गव्हार कृपेचा उद्धार
गयनी गव्हार कृपेचा उद्धार ।
वरुषला उदार अमृतमय ॥ १ ॥
तोंची बोध साचा मुक्ताईसी लाटा ।
चालिले वैकुंठा समारंबें ॥ २ ॥
कुंचे गरुडटके टाळ श्रुति हरि ।
चालिलें गजरीं हरिसंगे ॥ ३ ॥
निवृत्ति वैष्णव सोपान खेचर ।
करिताती गजर हरिनामें ॥ ४ ॥
सरलार्थ:
सद्गुरू गहिनीनाथांच्या अंतरातील गुज-गुह्य व कृपेतून निघालेला उद्गार – शब्द अमृत स्वरूपाचाच हा वर्षाव आहे ।।१।। तोच महाबोध मुक्ताईस प्राप्त झाला व समारंभपूर्वक सर्वचजण वैकुंठास चालले आहेत ।।२।। चवऱ्या, गरूडचिन्हांकित ध्वज, पताका, टाळ, विणा, यांच्यासह रांगेने हरिनामाचा गजर करीत हरिच्याच बरोबर ती दिंडी हरिनामाचा घोष करीत होते चालली होती ।।३।। निवृत्ति, विसोबा खेचर, सोपान हे वैष्णवहि हरिनामाचा घोष करत होते. ।।४।।
भावार्थ:
माझे श्री गुरु गहिनीनाथांनी माझ्यावर उदार अमृतमय कृपेचा वर्षाव केला आहे. तोच प्रेमवर्षाव मी नित्यमुक्त मुक्ताईवर केल्याने ती वैकुठांतील समारंभ येथेच भोगत आहे. टाळ, विणा व गरुडटके घेऊन ते हरिनामाचा उच्चार करत हरि बरोबर चालतात. निवृतिनाथ म्हणतात, हे वैष्णव असलेले सोपानदेव विसोबा खेचरादी सर्वजण विठ्ठलनामाचा गजर करतात.