१७३ चेतवि चेतवि सावधान जिवीं
चेतवि चेतवि सावधान जिवीं ।
प्रकृति मांडवी लग्न वोजा ॥ १ ॥
मातृका मायानिवेदन हरि ।
प्रपंचबोहरि रामनामें ॥ २ ॥
निवृत्तिदेवीं अद्वैत परणिली शक्ति ।
निरंतर मुक्ति हरि नामें ॥ ३ ॥
सरलार्थ:
प्रकृतिच्या मांडवात लग्न होत असता श्रीगुरुदैवत मायेचे स्वरूप सांगून मनामध्ये सावध करतात. व परमात्मस्वरूपाची चेतना-प्रेरणा देतात ।।१।। श्रीगुरु हे मातृदैवत-आई प्रेमाने निवेदन करून हरि व रामाच्या नामाने प्रपंचच चित्ताच्या बाहेर घालवतात ।।२।। निवृत्तिदेवाने अद्वैतशक्ती संपादन केली व हरिनामाने नित्य मुक्तिचा लाभ करून घेतला ।।३।।
भावार्थ:
हे जीवा अज्ञानाच्या झोपेतून जागा हो ज्ञानचेतना घे हे सावधान मंगलाष्टक आहे. अविद्येच्या मंडपात माये बरोबर तुझे लग्न लागले आहे. मातृका म्हणजे मायेचे पूजन असते शक्तीची रुपे आहेत किंवा शक्ती म्हणजेच माया तिची रुपे आहेत अश्या ह्या मायिक मातृकांचे पुजन करुन त्या प्रपंचा सह रामनाम घेत त्यालाच देऊन टाक. निवृत्तीनाथ म्हणतात ती माया देऊन टाकल्यामुळे मुक्ती नावाची कन्या प्राप्त होते व तिच्याशी परिणय केला म्हणजे शक्तीरुप निरंतर मुक्ती प्राप्त होते.