१८० मारुनि कल्पना निवडिलें सार

मारुनि कल्पना निवडिलें सार ।
टाकीलें असार फलकट ॥ १ ॥
धरिला वो हरि गोविलेंसे सर्व ।
विषयाची माव सांडीयेली ॥ २ ॥
पहाते दुभतें कासवी भरितें ।
नेत्रानें करितें तृप्त सदा ॥ ३ ॥
निवृत्ति अमृत गुरुकृपातुषार ।
सर्व ही विचार हरि केला ॥ ४ ॥

सरलार्थ:

गुरुगहिनीकृपेने कल्पना नष्ट करून सार शोधून काढले व असार-फोल टाकून दिले ।।१।। आता जो या सर्व विश्वात गोवला आहे- व्यापला आहे तो हरि आम्ही धरला आहे व नाशिवंत विषयाची आसक्ति सोडून दिली आहे ।।२।। श्रीगुरु कासवी आपल्या माया-डोळ्यांनी
गुरुकृपा दृष्टीने पाहात भरभरून दुभते अखंड तृप्ती देत आहे ।।३।। निवृत्तिस हे सारामृत गुरुगहिनीच्या कृपेने लाभले असून आता विचाराच्या सर्वांगाने हरि केला आहे. हरिशिवाय दुसरा विचारच राहिला नाही ।।४।।

भावार्थ:

मी कल्पनेचा त्याग केला व आत्मस्वरुपाचे सार स्विकारल्यामुळे मला फलकट संसार टाकता आला. नाम मंत्र जीवी धरल्यामुळे त्या व्यापक परमात्म्याला नामभक्तीने मनात गोवले त्यामुळे इंद्रियांना विषय उरला नाही मग विषय मला टाकता आले. जशी कासवी नेत्रातुन पान्हा देऊन पिलांचे पोषण करते तसे माझे पोषण गुरु करतात. निवृतिनाथ म्हणतात, गुरु गहिनीनाथांनी केलेले नामामृत तुशारांच्या वर्षावा मुळे माझा विचारच हरिरुप झाला बुध्दीला हरि वाचुन काही दिसत नाही.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *