१८६ आम्हां हेंचि थोर सद्गुरुविचार
आम्हां हेंचि थोर सद्गुरुविचार ।
नलगें संप्रधार नानामतें ॥ १ ॥
नेघों ते काबाड न करूं विषम ।
ब्रह्मांड हें होम आम्हां राम ॥ २ ॥
नेदूं यासि दुःख उन्मनीचें सुख ।
न करूं हा शोक आला गेला ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे आम्हां सद्गुरु उपदेश ।
सर्व भूतीं वास हरि असे ॥ ४ ॥
सरलार्थ:
सद्गुरू गहिनींचे विचार हेच आमचे मोठे धन आहे विविध संप्रदायाची नाना मते आम्हाला नकोत ॥१॥ आता ते काबाडकष्ट आम्ही जाणत नाही व वृत्तिचे वेगवेगळे विषयहि आम्ही करणार नाही. आमचा आत्मारामच आता ब्रह्माडस्वरूप परमात्मा झाला आहे. ।।२।। आता आम्ही या जीवास जागृतादि चार अवस्थाचे दुःख व पांचव्या उन्मनीचे सुख देणार नाही. आल्या गेल्याचा शोक करणार नाही ।।३।। सर्वाभूतात श्रीहरि वास करतो असा आम्हाला सद्गुरुचा उपदेश आहे असे श्री निवृत्तिनाथ म्हणतात. ।।४।।
भावार्थ:
आमच्या साठी श्री गुरुनी दिलेला विचार सर्वश्रेष्ट आहेत त्यापुढे आम्ही दुसऱ्या कोणत्याही विचाराला मानत नाही त्याची आम्हाला गरज नाही. श्री गुरुनी सांगितल्या प्रमाणे आम्ही रामनाम यज्ञ करत असल्याने दुसऱ्या विचारांचे काबाड म्हणजे कष्टाचे ओझे आम्हाला वागवावे लागत नाही. साधनेचे कष्ट देहाला न देता आम्ही नामजपाने उन्मनी अवस्थेचे सुख भोगतो त्यामुळे कोणताही शोक आम्हा जवळ येत नाही. निवृतिनाथ म्हणतात सर्वाठायी हरि हा गुरु गहिनीनी दिलेला आम्हाला उपदेश आहे.